Monday, 2 October 2017

‘रायसीन’वरील संशोधनातून साकारले स्टार्टअप - Courtesy SakaL Pune 19th August 2017


 तुम्ही शाळा, कॉलेजमध्ये असताना गंमत म्हणून वहीच्या कव्हरवरील अभिनेत्रींच्या चेहऱ्यावर दाढी-मिशा काढल्या असतील! पण अशाच प्रकारचे केस मुलीच्या किंवा महिलेच्या चेहऱ्यावर दिसल्यास ते कोणालाच आवडत नाहीत. अशा मुली, महिलांना चिडविण्याचे प्रकार तर सर्रास चालतात, पण त्यांना किती त्रास होत असेल याची कल्पना कोणालाच नसते. त्यामुळेच आत्मविश्‍वास गमावणे, सामाजिक आणि कौटुंबिक कार्यक्रमांपासून दूर राहणे, एकलकोंडेपणा अशी लक्षणे या महिलांमध्ये दिसतात. लग्नाच्या वयाची मुलगी असल्यास आणखीनच बिकट परिस्थितीला सामोरे जाण्याची वेळ तिच्यावर आणि तिच्या कुटुंबीयांवर येते. मृण्मयी भूषण यांनी असाच प्रसंग कुटुंबातील एका महिलेवर आल्यानंतर १९९४ मध्ये या अनैसर्गिक केसांच्या वाढीवर उपाय शोधण्याचा निश्‍चय केला. त्यावेळी मायक्रोबायोलॉजी विषयात पदव्युत्तर पदवी शिक्षण घेत असलेल्या मृण्मयी आणि भूषण विश्‍वनाथ यांनी २००३ मध्ये ‘माइंडफार्म नोवाटेक’ नावाची स्टार्टअप कंपनी स्थापन केली आणि संशोधन सुरू केले. 


मृण्मयी म्हणाल्या, ‘‘अनैसर्गिक केसांच्या वाढीला रोखणारे असे औषध बाजारात आजही उपलब्ध नाही. उपलब्ध पर्याय वॅक्‍सिंग किंवा तात्पुरत्या स्वरूपातील ‘हेअर रिमूव्हल’ प्रकारात मोडतात. लेझर तंत्रज्ञानाच्या आधारे काही उपचारपद्धती उपलब्ध आहेत, पण त्या महागड्या आहेत आणि भारतीय नागरिकांसाठी योग्य नाहीत. इंटरनेटवर सर्च केल्यानंतर आपल्याला अनेक ‘हर्बल प्रॉडक्‍ट’ दिसतात, पण ती विज्ञानाधारित उत्पादने नसतात. त्यातील ‘प्लॅंट एक्‍स्ट्रॅक्‍ट’च्या दाव्यातील तथ्य किती, ते कितपत सुरक्षित आहे, हजारो रुपये खर्चून ‘आउटपूट’ मिळेल का असे अनेक प्रश्‍न आपल्यासमोर असतात.’’

‘‘एरंडीच्या बियांतून मिळणाऱ्या ‘रायसीन’ घटकाचा योग्य वापर विविध प्रकारच्या उपचारांसाठी होऊ शकतो हे आयुर्वेदातही दिसते आणि ते आता शास्त्रीयदृष्ट्या सिद्धही झाले आहे. पुण्यात धायरीजवळ ॲप्ट रिसर्च फाउंडेशन या  संस्थेत संशोधनाला सुरवात केली तेव्हा या ‘रायसीन’ (ricin) नावाच्या ‘ॲक्‍टिव्ह इंग्रिडियंट’वर काम केले. रायसीनमुळे केसांची वाढ रोखता येते, म्हणजे ती नेमकी कशी कमी होते यावर अभ्यास करताना ‘मॉलिक्‍यूलर लेव्हल’वर नेमके काय होते याचा शोध घेतला. त्याचा ‘क्‍लिनिकल स्टडी’ पूर्ण केला. या तंत्रज्ञानाचे रूपांतर ‘कॉस्मेटिक प्रॉडक्‍ट डेव्हलपमेंट’मध्ये करताना ‘आयआयटी मुंबई’मधील तज्ज्ञांची मदत घेतली. या संशोधनाबद्दल २००७ मध्ये पहिले ‘इनोव्हेशन ॲवॉर्ड’ मिळाले,’’ असे मृण्मयी यांनी सांगितले. 

ऑक्‍सफर्ड विद्यापीठाची फेलोशिप, नॅशनल ॲवॉर्ड फॉर कमर्शियलायझेबल पेटंट्‌स, ‘वर्ल्ड काँग्रेस फॉर हेअर रिसर्च’मध्ये दोन आंतरराष्ट्रीय विज्ञान नियतकालिकांमध्ये प्रबंधांचे सादरीकरण आणि २०११ मध्ये मिळालेला ‘डीएसटी लॉकहीड इंडिया इनोव्हेशन ॲवॉर्ड’ ही मृण्मयी यांनी आतापर्यंत केलेल्या कामाची पावतीच म्हणावी लागेल. 

‘रायसीन’विषयी   गैरसमज
‘रायसीन’ या घटकाविषयी पाश्‍चिमात्य देशात मोठे गैरसमज आहेत. रासायनिक युद्धामध्ये ‘रायसीन’चा वापर होऊ शकतो असा ठाम समज असल्यामुळे आणि शास्त्रीयदृष्टीने त्याच्या चांगल्या कारणांसाठीचे उपयोग आजपर्यंत सिद्ध न झाल्यामुळे हे गैरसमज आहेत. त्यामुळेच ‘रायसीन’चा समावेश आजही ‘केमिकल वेपन कन्व्हेन्शन’मध्ये आहे. प्रत्यक्षात रायसीनमुळे आजपर्यंत एकही माणूस मेलेला नाही. बदनाम झालेले हे ‘प्रोटिन’ उपचारासाठी खूप उपयुक्त आहे. त्यामुळे केमिकल वेपन कन्व्हेन्शनमधून ‘रायसीन’ला वगळावे यासाठी भारतात आणि परदेशातही आम्ही वेगवेगळ्या व्यक्तींना, सरकारी पातळीवरील उच्च पदस्थांना पत्रे लिहिली आहेत. 
‘रायसीन’विषयीच्या या गैरसमजांमुळे आम्ही संशोधनाच्या वेळी केंद्र सरकारच्या ‘डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्‍नॉलॉजी’ची वेळोवेळी परवानगी घेतली. त्यामुळे या तंत्रज्ञान विकासाच्या कामात आणि भविष्यात तंत्रज्ञान हस्तांतरणाच्या प्रक्रियेत भारतासह जगात कोठेही अडचण येणार नाही. भारतासह ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि ब्रिटनमध्ये आम्ही तंत्रज्ञानासाठीचे पेटंट घेतले आहे. अजून काही पेटंट मंजुरीच्या प्रक्रियेत आहेत. येत्या दीड वर्षात ‘फेज २ क्‍लिनिकल ट्रायल’ची प्रक्रिया आम्ही पूर्ण करत आहोत. हा टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर आमच्या तंत्रज्ञानाला बहुतांश बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून मागणी येईल. मात्र, या ‘ट्रायल्स’साठी निधीची आवश्‍यकता आहे आणि त्यासाठी आम्ही गुंतवणूकदाराच्या शोधात आहोत. साधारणतः २५ कोटी रुपयांची, परंतु टप्प्याटप्प्यातील गुंतवणूक आम्हाला अपेक्षित असल्याचे मृण्मयी यांनी सांगितले.

http://www.esakal.com/pune/pune-news-startup-67140

No comments:

Post a Comment

We are eager to listen to you. Do write to us. We shall implement as much we can agree to. Certainly your say matters to us.